केजच्या शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण, कुऱ्हाडीने केले सपासप वार
तुमची मुलगी मला द्या…
केजच्या शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण, कुऱ्हाडीने केले सपासप वार
शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे.
केज : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे गुन्हेगारीच्या घटनांमुळे निघत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या घटना ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे. जेव्हा कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक होते, गुंड व माफियांचे राज्य सुरू तेव्हा बिहारसदृष्य परिस्थिती झालीय, असे म्हटले जाते. माजलगावातील खुनाच्या घटना ताज्या असताना केज तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तुमची मुलगी मला द्या… असे म्हणत शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
गावगुंडाने केली जबर मारहाण बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुमची मुलगी मला द्या… असे म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले आणि हा अपघात दर्शविण्यात आला. बाजीराव डोईफोडे असे जखमी शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या प्रकरणात पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचं म्हटल आहे.