बनसोड व इनामदार बांधणार अजितदादांचे घड्याळ हाती


हरून इनामदारांच्या माध्यमातून केजमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी होणार आता भरभक्कम

केज : प्रतिनिधी

केजच्या राजकीय परिघावर मोठी घडामोड होताना दिसत आहे.येत्या २२ एप्रिल रोजी केजमध्ये राजकीय भूकंप होत असून केजच्या नगराध्यक्ष सौ.सीताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक हरून भाई इनामदार यांनी जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करत केज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या निर्णयामुळे केज शहराचे व बीड जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलणार आहे.केजच्या नगराध्यक्ष सौ.सीताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार यांचा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी मुंबई येथील वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे.

Advertisement

केज शहराची सत्ता प्रामुख्याने जनविकास परिवर्तन आघाडीकडे आहे. जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोड व संस्थापक हरून भाई इनामदार यांच्या नेतृत्वाला केज शहराने पसंती दिलेली आहे. १४ फेब्रुवारी २०२२ साली नगराध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर केज शहरात विकासाचा झपाटा लावलेला आहे. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायती पैकी क्रमांक एकची नगरपंचायत केज नगर पंचायत ठरली आहे. गेल्या तीन वर्षात विकास कामात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.केज शहराला नवी ओळख मिळवून देण्यात हरूनभाई इनामदार यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. गेल्या तीन वर्षात स्वच्छतेच्या बाबतीत असेल, पाणीपुरवठ्याच्या बाबतीत असेल किंवा गावातील विकासाच्या बाबतीत असेल स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनसामान्यांचा विश्वास संपादन करून सामाजिक व राजकीय पटलावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. केज शहराचा कायापालट करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष आणि नेतृत्व असणे आवश्यक आहे म्हणून केजच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोड व हरुणभाई इनामदार यांनी योग्य असा राजकीय पर्याय निवडण्याचा अधिकार आपल्या तमाम कार्यकर्ता वर्गाकडे सुपूर्द केला होता. अखेर सर्वानुमते इनामदार यांनी विकासासाठी सत्ता आणि सत्तेसाठी विकास हे ब्रीद समजून घेत उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने येत्या मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी मुंबई येथे वानखेडे स्टेडियम या ठिकाणी नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हरूनभाई इनामदार पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, ना.दिलीप वळसे पाटील, आ. धनंजय मुंडे,आ. विजयसिंह पंडित, आ.प्रकाशदादा सोळंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रवेशाची जोरदार तयारी इनामदार समर्थकांकडून केली जात आहे.शेकडो गाड्यांचा ताफा यात असणार आहे. इनामदार यांच्या पक्षप्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.राष्ट्रवादीत अजितदादा गटाकडे प्रभावी व वक्तृत्व संपन्न मुस्लिम चेहरा नाही म्हणून हरून भाई इनामदार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. बीड जिल्ह्यात इनामदार यांना मानणारा मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या व्होट बँकेला इनामदार यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे.आगामी काळात राष्ट्रवादीची बुलंद तोफ म्हणून इनामदार यांच्याकडे पाहिले जाणार आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा तेवढी ताकद हरूनभाई इनामदार यांना देणे गरजेचे आहे. सध्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व संस्थापक हरुनभाई इनामदार तसेच केज नगर पंचायत मधील जनविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी अनेक गावचे सरपंच, उपसरपंच ,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन याशिवाय जिल्हाभरातील असंख्य कार्यकर्ते इनामदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. इनामदार यांच्या पक्षप्रवेशामुळे अजितदादांची राष्ट्रवादी आणखी भक्कम होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!