बजरंग सोनवणेंच्या अर्धांगिनी उतरल्या प्रचारात


सारिकाताई सोनवणेंनी घेतली केजमध्ये महिलांची कॉर्नर बैठक

केज : प्रतिनिधी

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी प्रत्येक तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या असून प्रत्येक गावात अभूतपूर्व स्वागत व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा परिषद सदस्या सारीकाताई सोनवणे या प्रचारात उतरल्या आहेत. त्यांनी शहरातील क्रांतीनगर भागात महिलांची कॉर्नर बैठक घेतली.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव झालेल्या बजरंग सोनवणे यांनी मतदारांचा सन्मान राखण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणे यांनी पायात भिंगरी बांधून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन जास्तीत जास्त मतदारांशी कसा संवाद साधता येईल. असे तालुका निहाय प्रचार दौऱ्याचे नियोजन करीत भेटीगाठीवर भर दिला आहे. काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे आशीर्वाद आणि मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे दौरे सुरू आहेत. मतदार संघातील अनेक गावात प्रचार दौरे करीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावांमध्ये ग्रामदैवत, विविध देव देवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत व महापुरुषांच्या नावे असलेल्या चौकात पुष्पहार अर्पण व अभिवादन करीत कॉर्नर बैठका, मतदारांच्या संवाद साधून त्यांनी जिल्ह्यातील वातावरण ढवळून काढले आहे. गावा – गावात नागरिकांकडून होत असलेले अभूतपूर्व स्वागत, महिलांकडून औक्षण आणि नागरिकांचा चांगला प्रतिसादाने त्यांचा उत्साह वाढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी तालुका निहाय झंझावाती दौरे काढून कडक उन्हात गावा – गावाना भेटी देत नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे.

Advertisement

बजरंग सोनवणे यांचे प्रचार दौरे सुरू असताना त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा परिषद सदस्या सारीकाताई सोनवणे या प्रचारात उतरल्या आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत महिला मतदारांतून चांगला प्रतिसाद मिळविला होता. या निवडणुकीत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून केज शहरात नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.१ पासून सुरुवात केली आहे. या प्रभागातील क्रांती नगर भागात महिलांची कॉर्नर बैठक घेत महिलांशी संवाद साधला. महिला मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांनी बजरंग सोनवणे यांना मत देण्याचे आवाहन केले. यावेळी महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षा शीतल लांडगे,काँग्रेसच्या मा.नगरसेविका ज्योतीताई लक्ष्मण जाधव,मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेल्या सोनम वाघमारे यांचा सौ.सारिकाताई सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!