कमलेश मिना यांच्या पथकाने कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला !
केज:प्रतिनिधी
केज येथे कत्तल करण्यासाठी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या पथकाने पकडला आहे.
या बाबतची माहिती अशी की,गुरुवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांना अशी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एका टेम्पोतून गोवंशीय प्राणी घेऊन ती कत्तलखान्याकडे घेऊन जात आहेत. माहिती मिळताच कमलेश मिना यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या पथकाला दिले.
आदेश मिळताच त्यांच्या पथकातील पोलीस नाईक विकास चोपणे,अनिल मंदे,माने,भुंबे,डापकर,मुंडे यांनी सापळा रचून केज-कळंब रोडवरील हॉटेल संतोष पॅलेस समोर एक टाटा टेम्पो क्र.(एम एच-२३/७४३) हा अडवून ताब्यात घेतला.पंचासमक्ष त्याची झडती घेतली. त्या टेम्पो मध्ये २० गोवंशीय प्राणी आढळून आले.त्यात २ गाय,२ बैल,३ कारवड,८ गोरे,३ वगारी व २ रेडे यांचा समावेश आहे.
चालकाकडे विचापुस केली असता ही जनावरे ही कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.तसेच वाहन चालकाकडे पशु वाहतूक परवाना नसताना त्याने क्रूर पद्धतीने जनावरांची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन व गोवंशीय प्राणी ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनिय १९७६ चे कलम ५-अ (१) व ५-अ (२) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.